ताज्या घडामोडीभोरराजगड पोलीस

श्रीरामनगरमध्ये सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा; पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली चार आरोपींना अटक


खेड शिवापूर : हवेली तालुक्यातील श्रीरामनगर (बांडेवाडी) येथे कोंढणपूर रोडलगत असलेल्या श्रीनाथ ज्वेलर्स या सराफ दुकानात चार अनोळखी व्यक्तींनी शस्त्रांचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची घटना १६ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी तपासादरम्यान चार आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजीत शांताराम कांडेसर (वय २६, सध्या रा. आंबेगाव बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) हे घटनेच्या वेळी आपल्या श्रीनाथ ज्वेलर्स या दुकानात कारागीर नितीन सुभाष क्षीरसागर यांच्यासह उपस्थित होते. त्यावेळी काळ्या रंगाचे कपडे घातलेले चार अनोळखी इसम दुकानात आले. त्यापैकी एका इसमाने बॅगेतून बंदुकीसारखे दिसणारे हत्यार काढून कारागिराच्या डोक्याला लावले, तर इतरांना कोयता व बंदुकीसारख्या हत्याराचा धाक दाखवण्यात आला.

यानंतर आरोपींनी दुकानातील काउंटरवर ठेवलेल्या सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या, अर्धा तोळा वजनाच्या पाच सोन्याच्या अंगठ्या जबरीने चोरून नेल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासादरम्यान ईश्वर गोपीनाथ वाघमारे (वय ३०, रा. वांगी बुद्रुक, ता. धाराशिव), शैलेश हरीश साबळे (वय २१, रा. शिवाजीनगर, खेडशिवापूर), तानाजी नामदेव लोंढे (वय ३९, रा. शिवाजीनगर, खेडशिवापूर) आणि करण गोपाळ हजारे (वय २१, रा. शिवाजीनगर, खेडशिवापूर) या चार आरोपींना गुन्ह्याच्या तपासासाठी अटक केली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव करत आहेत.

— पुण्यभूमी न्यूज


PUNYABHUMI NEWS

संपादक : मंगेश राजेंद्र पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *