भोंगवलीत भरदिवसा घरफोडी; ३ लाख ६९ हजारांचा ऐवज लंपास.
मंगेश पवार
सारोळे :- भोर तालुक्यातील भोंगवली येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, चांदीची नाणी आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे भोंगवली येथे ही घटना घडली. फिर्यादी विवेक विष्णू पाटील (वय ६४, व्यवसाय शेती, रा. भोंगवली, ता. भोर) यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून एका अनोळखी इसमाने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून त्यातील सोन्याचे दोन मंगळसूत्र, दोन सोन्याच्या नथी, चांदीची १२ जुनी नाणी आणि ५०० रुपयांच्या दहा नोटा असा एकूण ३ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
संशयित इसम सावळ्या रंगाचा असून त्याने चौकड्यांचा जांभळ्या रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट परिधान केला होता. या वर्णनाच्या संशयिताचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास राजगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

संपादक : मंगेश राजेंद्र पवार
