ताज्या घडामोडीभोरशिक्षण

किकवी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात भोंडला, गरबा व दांडियाचा उत्साह


मंगेश पवार

सारोळे : किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी येथे नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला, गरबा व दांडिया कार्यक्रम उत्साहात पार पडला. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि महिला शिक्षिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून भारतीय संस्कृती, परंपरा आणि स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थिनी व महिला शिक्षिकांनी पारंपरिक भोंडला, गरबा आणि दांडियामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. खिरापत ओळखण्याचा मनोरंजक उपक्रम आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेला गरबा विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रमाच्या समारोपानंतर विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका संगीता राऊत, संजीवनी सुतार, दीप्ती वीर आणि स्वाती दळवी यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्याध्यापक विनोद राऊत यांनी सर्व विद्यार्थ्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच किकवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भिलारे व संचालक मंडळाने या सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

भारतीय सांस्कृतिक परंपरांचे जतन, विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे आणि स्त्रीशक्तीचा सन्मान करणे या उद्देशाने आयोजित हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

पुण्यभूमी न्यूज


PUNYABHUMI NEWS

संपादक : मंगेश राजेंद्र पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *