छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी येथे संविधान दिन उत्साहात साजरा.
मंगेश पवार
सारोळे : किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी येथे गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व विशद करणारी आपली मनोगते व भाषणे सादर केली.
याप्रसंगी किकवी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. नवनाथ कदम, ग्रामविकास अधिकारी श्री. विजय गेजगे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विनोद राऊत व उपशिक्षक श्री. अमोल बोबडे यांनी संविधान दिनाचे महत्त्व, भारतीय नागरिकांचे हक्क व कर्तव्ये आणि लोकशाही मूल्ये याविषयी मार्गदर्शन केले.
शहीद दिनानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून भविष्यात जबाबदार व आदर्श नागरिक बनावे तसेच विविध क्षेत्रांत यश संपादन करावे, असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने योग्य अभ्यासाचे नियोजन करून आपले ध्येय निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले.
या निमित्ताने विद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत संविधानविषयक विविध संकल्पना रांगोळीच्या माध्यमातून साकारल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विनोद राऊत यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मिलिंद मगर यांनी केले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

संपादक : मंगेश राजेंद्र पवार
