ताज्या घडामोडीभोरराजगड पोलीस

पुरंदर तालुक्यातील पानवडी दुहेरी हत्याकांडातील संशयित २४ तासात जेरबंद; येरवड्यापासून नसरापूरपर्यंत पोलिसांचा थरारक पाठलाग.


मंगेश पवार

पुरंदर तालुक्यातील पानवडी येथे वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपीला राजगड आणि सासवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने जेरबंद केले. संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांनी येरवडा, लक्ष्मीनगर, खराडी, कोंढवा, नवले ब्रिज, खेड शिवापूर टोल ते चेलाडी-नसरापूर ब्रीजपर्यंत पाठलाग केला. या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, हत्याकांडाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

 

पानवडी येथे २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नमाला मोहन धिवार (वय ७२) आणि मोहन बाबुराव धिवार (वय ८३) या वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे पानवडी गावासह पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी गणेश सुभाष धिवार (वय २७, रा. पानवडी) याच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गायी-बैल घेऊन जाण्यावरून झालेल्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयिताचा शोध घेण्यासाठी राजगड आणि सासवड पोलिसांनी संयुक्त पथकाच्या माध्यमातून शोधमोहीम राबवली.

 

 

संशयित आरोपीचा माग काढताना पोलिसांनी येरवडा, लक्ष्मीनगर, खराडी, कोंढवा, नवले ब्रिज आणि खेड शिवापूर टोलमार्गे चेलाडी-नसरापूर ब्रीजपर्यंत पाठलाग केला. अखेर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईत दोन्ही पोलीस ठाण्यांच्या पथकांनी समन्वयाने काम केले.

 

या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले, तुकाराम राठोड आणि सोनवणे यांच्यासह पोलीस हवालदार औदुंबर आडवाल, राहुल पठाडे, समीर भालेराव, पप्पू शिंदे, काळे, सोनवणे, लोंढे, शेंडे, मखरे तसेच पोलीस शिपाई अनिकेत सोनवणे, चारुदत्त देशमुख, राऊत, हिप्परकर, चव्हाण आणि कुमावत यांनी सहभाग घेतल्याची माहिती आहे.

 

या प्रकरणात पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून घटना घडल्याचे सांगितले होते. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे करीत असून, संशयिताच्या चौकशीतून हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


PUNYABHUMI NEWS

संपादक : मंगेश राजेंद्र पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *