टंचाईच्या झळा वाढण्यापूर्वी कुडाळी प्रकल्पाचे पाणी सोडा; कालव्याची तात्पुरती जोडणी करून लाभक्षेत्रातील गावांना पाणी देण्याची जावळीचे भूमिपुत्र शशिकांत शिंदे यांची मागणी
प्रतिनिधी : बजरंग चौधरी
मेढा : जावली तालुक्यातील कुडाळी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात अत्यल्प पावसामुळे टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, सरताळे कापसेवाडी या भागातील प्रत्यक्ष शेतावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली असता सोयाबीन भुईमूग व पारंपरिक पिकांचे मोठ्या प्रमाणावर पावसाअभावी नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन कुडाळी प्रकल्पाच्या कालव्याची तात्पुरती जोडणी करून डाव्या कालव्यातून धरणाचे पाणी सोडावे, अशी स्पष्ट मागणी केली आहे.
कुडाळी प्रकल्पाच्या कालव्याची पाइपलाइनद्वारे बहुतांशी कामे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा उपयोग लाभक्षेत्रातील गावांना करण्यासाठी आवश्यक ती तात्पुरती जोडणी करून पाणी सोडण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने जावली तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः कुडाळी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि शेतकरी सातत्याने कॅनॉलद्वारे प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पाणी उपलब्ध असताना केवळ कालव्याची जोडणी किंवा तांत्रिक बाबींमुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू नये, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक तांत्रिक कार्यवाही पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कुडाळी प्रकल्पाच्या कालव्याची पाइपलाइनची बहुतांशी कामे पूर्ण झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात जोडणी करून डाव्या कालव्यामध्ये धरणाचे पाणी सोडल्यास लाभक्षेत्रातील गावांना मोठा दिलासा मिळू शकतो, असा मुद्दा शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
टंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची वाट न पाहता पाटबंधारे विभागाने उपलब्ध पाण्याचे नियोजन करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
टंचाई वाढण्यापूर्वी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून कुडाळी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी जावलीचे भूमिपुत्र शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

संपादक : मंगेश राजेंद्र पवार




