भोर तालुक्यातील संभाजीनगर पांडे येथे भरदिवसा घरफोडी; ३ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास!
मंगेश पवार
सारोळे :- भोर तालुक्यातील संभाजीनगर पांडे येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव सुभाष कोहोक (वय ४०, व्यवसाय रिअल इस्टेट, रा. संभाजीनगर पांडे, ता. भोर, जि. पुणे) यांच्या राहत्या घरी दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.३० ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली.
अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कडी-कोयंड्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी व लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पट्टी गंठण व दोन मोठ्या सोन्याच्या वाट्या, तसेच १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण व दोन लहान सोन्याच्या वाट्या आणि २५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४२४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ व ३३१(३) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मयूर निंबाळकर करीत असून आहेत.

संपादक : मंगेश राजेंद्र पवार
