सारोळा ते खेडशिवापूरदरम्यानच्या ७ पेट्रोल पंपांवर इंधन व्यवहारात ११.५२ लाखांचा अपहार! सीएनजी वाहतुकीच्या नावाखाली कंपनीची फसवणूक
मंगेश पवार
भोर : सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गॅस भरल्याचे तसेच पेट्रोल आणि डिझेल भरल्याचे खोटे दाखवून इंधन कार्डच्या माध्यमातून कंपनीची तब्बल ११ लाख ५२ हजार ४९७ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात १३ नामनिर्दिष्ट व्यक्तींसह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अविनाश रोहिदास आगळे (वय ४२, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओ फास्ट प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद शाखा पुणे विभागातील सीएनजी पंपांना टोरंट कंपनीच्या गॅसची वाहतूक करण्याचे काम करणाऱ्या अशोक लेलँड वाहनांवरील चालकांनी हा प्रकार केल्याचा आरोप आहे. ८ ऑक्टोबर २०२५ ते ८ जून २०२६ या कालावधीत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संबंधित चालकांकडे असलेल्या एचपी कंपनीच्या ड्राइव्ह ट्रॅक प्रीपेड कार्डचा (फ्युएल कार्ड) वापर करून कुदळे पेट्रोल पंप, योगायोग कोंडे देशमुख पेट्रोल पंप, शिरोळे ब्रदर्स पेट्रोल पंप (खेडशिवापूर), राजगड पेट्रोल पंप (वरवे बुद्रुक), राजगड पेट्रो स्टेशन (केळवडे), न्यू गोल्डन सर्व्हिस पेट्रोल पंप (केळवडे) आणि राजेश ऑटोमोबाईल (कापूरहोळ) या ठिकाणी व्यवहार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये प्रत्यक्षात न भरलेला अतिरिक्त गॅस तसेच पेट्रोल व डिझेल भरल्याचे कार्डवरील व्यवहारांमध्ये दाखवून संबंधित पेट्रोल पंपांवरून रोख रक्कम स्वीकारण्यात आली. अशा प्रकारे कंपनीची ११ लाख ५२ हजार ४९७ रुपयांची फसवणूक करून स्वतःच्या फायद्यासाठी रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी अतुल भिमराव लेकावळे, राजेंद्र लक्ष्मण चव्हाण, प्रवीण लक्ष्मण चव्हाण, तुकाराम नामदेव गाडे, हनुमंत लिंबा पोळ, सुनील दत्तात्रय शेलार, निलेश वसंत अस्वले, जयवंत गुलाब कदम, महेंद्र प्रल्हाद जाधव, महेंद्र चिमाजी गायकवाड, मच्छिंद्र सुनील खुडे, शंकर निवृत्ती खुटवड आणि सचिन दत्तात्रय मळेकर या १३ जणांसह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी राजगड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मछले करीत आहे.

संपादक : मंगेश राजेंद्र पवार
