भोर तालुक्यात पोलीस पाटलांची निर्घृण हत्या; अशोक येनपुरे यांच्या मृत्यूने घोरेपडळ-सांगवी बुद्रुक परिसर हादरला!
भोर तालुक्यातील घोरेपडळ-सांगवी बुद्रुक येथे पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांच्यावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण काय, हल्लेखोर कोण होते आणि ही घटना कोणत्या कारणातून घडली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. घटनेमागील कारणांचा शोध घेणे, हल्लेखोरांची ओळख पटवणे आणि संबंधित आरोपींना अटक करणे, हे पोलिसांसमोर महत्त्वाचे आव्हान असणार आहे.
दरम्यान, पोलीस पाटलांच्या हत्येच्या घटनेमुळे भोर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

संपादक : मंगेश राजेंद्र पवार
