ताज्या घडामोडीभोरशिक्षण

किकवी विद्यालयात दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी कलाकौशल्य कार्यशाळा उत्साहात संपन्न!


मंगेश पवार

सारोळे : किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी येथे दिवाळी सणाचे औचित्य साधून मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कलाकौशल्यांवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत पणती सजावट (डेकोरेशन), डोअरमॅट सजावट, मॅटवरील रांगोळी नक्षीकाम तसेच कापडावर आकर्षक नक्षीकाम करण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.उपशिक्षिका सौ. दीप्ती वीर म आणि उपशिक्षक श्री. रामचंद्र धानवले सर यांनी विद्यार्थ्यांना विविध कलाप्रकारांचे तंत्र समजावून सांगत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही विविध कलाकृती साकारत या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कलात्मक दृष्टिकोन, कल्पकता आणि हस्तकौशल्य विकसित व्हावे, तसेच सण-उत्सवांच्या माध्यमातून पारंपरिक कलांचे जतन व्हावे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाल्याने कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद दशरथ राऊत यांनी मार्गदर्शकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच संस्था अध्यक्ष  दत्तात्रय भिलारे, उपाध्यक्ष  प्रशांत कोंढाळकर, सचिव राजेंद्र भोसले व सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाची दखल घेऊन त्याचे कौतुक केले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या कलाकृती साकारण्याचा उत्साह अधिक वाढला.


PUNYABHUMI NEWS

संपादक : मंगेश राजेंद्र पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *