“सारोळेच्या कॉलेज विद्यार्थ्यांचा प्रवास होणार सुखकर! गणेश निगडे यांच्या पाठपुराव्याला यश; एसटी फेरीच्या मार्गात बदल.”
मंगेश पवार
सारोळे :-भोर तालुक्यातील भोंगवली परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी भोर आगाराच्या एसटी बस फेरीच्या मार्गात आणि वेळेत बदल करण्यात आला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश शरदराव निगडे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून संबंधित एसटी फेरी सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भोर आगाराने दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे यांच्याकडे यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता.
त्यानुसार भोर–वीर ही एसटी फेरी भोर–सारोळा–भोंगवली–हिंगेवाठार मार्गे वीर अशी सुरू करण्याबाबत तसेच फेरीच्या वेळेत बदल करून सकाळी ११ वाजता सेवा उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या मार्गावरील विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन गणेश निगडे यांनी एसटी महामंडळाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून प्रवाशांना या बदलाचा फायदा होणार आहे.
गणेश निगडे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागातील एसटी वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

संपादक : मंगेश राजेंद्र पवार
