धांगवडीत भरदिवसा घरफोडी; ८० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
मंगेश पवार
भोर : भोर तालुक्यातील धांगवडी येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवार (दि. २७ ऑक्टोबर) रोजी घडली. याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धांगवडी येथील संतोष रामचंद्र वीटकर हे पत्नी नीलम यांच्यासह कामानिमित्त कांदळी (ता. पुरंदर) येथे गेले होते. तर त्यांची दोन्ही मुले शाळेत गेली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर घरातील शोकेसच्या कपाटात ठेवलेले अंदाजे एक तोळे वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत ६० हजार रुपये), दोन ग्रॅम वजनाची सोन्याची फुले (किंमत १० हजार रुपये) आणि दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा (किंमत १० हजार रुपये), असे एकूण ८० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मयूर निंबाळकर करीत असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे काम राजगड पोलीस करीत आहेत.

संपादक : मंगेश राजेंद्र पवार
