ताज्या घडामोडी

बहिणाबाई फडकती ध्वजा !


संत कृपेने उभा राहिलेल्या वारकरी संप्रदायाच्या इमारतीवरील फडकती ध्वजा म्हणजे संत बहिणाबाई! त्यांनी स्वतःच तसा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. एकंदर वारकरी संप्रदायाच्या उभारणीत कुणा कुणाचे काय योगदान आहे, याची नोंद बहिणाबाईने एका अभंगाद्वारे करून ठेवली आहे. बहिणाबाई लिहितात-
संत कृपा झालीl
इमारत फळा आलीll
ज्ञानदेवे रचिला पायाl उभारिले देवालयाll
नामा तयाचा किंकर l
तेणे केला हा विस्तारll
जनार्दन एकनाथl
खांब दिला भागवतll
तुका झालासे कळसl
भजन करा सावकाशll
बहिणी म्हणे फडकरी ध्वजा l
निरुपण केले ओझा ll
वारकरी संप्रदायाचे पाया ज्ञानेश्वर महाराज, विस्तारक नामदेव महाराज, खांब एकनाथ महाराज तर कळस तुकाराम असून या कळसावरील फडकती ध्वजा म्हणजे संत बहिणाबाई!
म्हणूनच नवरात्री निमित्ताने आपण मांडत असलेल्या महिला संत मालिकेचा समारोपही बहिणाबाई यांच्या कार्याची ओळख करून देऊन करण्यात येत आहे.
महिला संतांच्या मालिकेत समाजाच्या सर्वांत शेवटच्या पायरीवर असणा-या कान्होपात्रा पासून राज घराण्यातील मीराबाई पर्यंत आपण आढावा घेतला. मीराबाई लौकिक अर्थाने सर्वोच्च सामाजिक पद असणा-या राज घराण्यातून आल्या तर बहिणाबाई सामाजिक वरच्या स्थर मानल्या गेलेल्या ब्राह्मण समाजातून आलेल्या आहेत. परंतू दोघींनीही गुरू करताना सामाजिक प्रथिष्ठेची बंधने जुगारून देऊन तत्कालीन समाज व्यवस्थेत खालच्या पातळीवर असलेल्या व्यक्तींचा गुरू म्हणून स्वीकार केला. मीराबाईने चर्मकार समाजातील रोहिदास यांना गुरू केले होते. तर ब्राह्मण समाजात जन्मलेल्या बहिणाबाई यांनी स्वतः कुणबी म्हणवून घेणा-या तुकाराम महाराज यांना गुरू केले. खालच्या समाजातील व्यक्तीला गुरू केल्यामुळे दोघींनाही समाजातून खूप छळ सहन करावा लागला.
बहिणाबाईंचा जन्म वेणगंगा नदीच्या तिरावर वसलेल्या देवगांव रंगारी या ठिकाणी जानकी आणि आऊजी कुलकर्णी या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्या काळच्या चालिरीतींप्रमाणे वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह गावापासुन काही अंतरावर असलेल्या 30 वर्षांच्या रत्नाकर ऊर्फ गंगाधर पाठक या अत्यंत कोपिष्ट व्यक्तीशी झाला. गंगाधर पाठक यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे उदर निर्वाह करण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणी स्थलांतर करावे लागले. असे स्थलांतर करीत ते कोल्हापूर येथे पोहचले. बहिणाबाई कोपिष्ट आणि आपल्यापेक्षा तीनपट वयाने मोठ्या असलेल्या पतीचा संसार चालवत होत्या. संसारिक जीवनात त्यांचे मन रमत नव्हते. कोल्हापुरात असताना बहिणाबाई भजन-कीर्तनात अधिकाधिक वेळ घालवू लागल्या. कोल्हापुर येथेच जयराम स्वामी यांची कथा- किर्तनं ऐकुन त्या फार प्रभावित झाल्या. जयराम स्वामी कीर्तनासाठी तुकाराम महाराज यांचे अभंग निरुपणासाठी निवडीत असत. अभंगाचे निरुपण करताना तुकाराम महाराज यांचे ज्ञान, वैराग्य, कार्य याचा उल्लेख जयराम स्वामी यांच्या निरुपण येत असे. त्यामुळे बहिणाबाईच्या मनात तुकाराम महाराज यांच्या विषयी उत्सुकता वाढली. कथा – कीर्तन संपल्यानंतरही बहिणाबाई जयराम स्वामी यांच्याकडून तुकाराम महाराज यांच्या विषयी जाणून घेऊ लागल्या. यातून तुकाराम महाराजांचा त्यांनी ध्यास घेतला. कायम तुकाराम महाराजांचे अभंग ओव्या गुणगुणु लागल्या. तुकाराम
महाराज यांच्या भेटीची ओढ लागली. या भेटीची ओढ किती तीव्र होती हे सांगताना बहिणाबाई लिहितात-
मच्छ जैसा जळावाचून चडफडी l
तैसी ते आवडी तुकोबाची ll
मशाची पाण्या वाचून जशी तडफड होते, तशी आपली अवस्था झाली असल्याचे बहिणाबाई लिहितात.
आपण ब्राम्हण असताना आपली पत्नी कुणबी तुकाराम महाराज यांचे गुणगान करते, हे गंगाधर पाठक यांना सहन होत नव्हते.
कैचा शूद्र तुका स्वप्नीचे दर्शनी l
बिघडली पत्नी काय करू ll
अशी गंगाधर पाठकाची अवस्था होती. परंतु आता बहिणाबाई यांना तुकाराम महाराज यांच्या विचारांपासून कुणीही दूर करू शकत नव्हते. तुकाराम महाराज यांच्या विषयीच्या भावना व्यक्त करताना त्या म्हणतात-
कलयुगी बौद्धरूप धरी हरी l
तुकोबा शरीरी प्रवेशला ll
देव आणि तुकाराम महाराज यांच्यात बहिणाबाई यांच्या लेखी कोणताच भेद उरला नव्हता. बहिणाबाई यांनी तुकाराम महाराज यांचा वैचारिक वारसा चालविला. त्यांनी अनेक अभंग लिहिले. त्यातील 780 अभंग सध्या उपलब्ध आहेत. जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे तोपर्यंत बहिणाबाई यांची ही अभंग ध्वजा फडकत राहील.
– शामसुंदर महाराज सोन्नर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: