ताज्या घडामोडी

श्री संत गजानन महाराजांचे संपूर्ण चरित्र लेखक-श्री संत वासुदेव महाराज(ज्ञानेश्वरदास) अध्याय एकविसवा


हरी 🕉️नमोजी परब्रम्हात्मेष । हरीः ॐ नमोजी विश्वी विश्वात्मा विश्वेश । हरीः ॐ नमोजी श्री गणेश । हरिः ॐ योगेश नमो नमो ॥१॥ शके अठराशे अठ्ठयाणवाला । चैत्र कृष्ण पंचमीला । श्री भास्कर महाराज पुण्यतिथीला । सप्ताहाला एकोणसत्तराव्या ॥२॥ अपार पालख्या दिंड्या येत । प्रदक्षिणा करूनि कीर्तनी बैसत । लाखो भक्त श्रवण करित । श्री समाधि वृत्त कीर्तनी ॥३॥ जगद्गुरु तुकोबांचा अभंग । वासुदेव महाराज घेती चांग । श्री समाधि संजीवन प्रसंग । यथा सांग वर्णावया ॥४॥ अभंग – “आता हेचि जेऊ । सवे घेऊ शिदोरी । हरि नामाचा खिचडी काला । प्रेमे मोहिला साधने । चवी चवी घेऊ ग्रास । ब्रह्मरस आवडी । तुका म्हणे गोड लागे । तो तो मागे रचना “। पुढती पुढती नमन । घालुनिया लोटांगण । पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरणा संताचिया ॥५॥ नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा । नमो सद्गुरू सच्चिदानंदरुपा । नमो सद्गुरू भक्त कल्याणमूर्ती । नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ॥६॥आत्मरूप गणेशु सुरेखा । ज्ञानचित्सूर्य भास्कर देखा । तोवरी तोवरी शोभती दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥७॥ निरसूनी अविद्या अंधार । दवडूनि अहं सोहं विकार । फेडिले मुक्तीचे कुहर । सद्गुरु भास्कर अरुणोदयी ॥८॥ ज्ञानाज्ञान दोन्ही । पोटी सूनि अहनी । उदेला चिद् गगनी । चिदादित्यु हा ॥९॥ ‘स भास्कर परं ब्रम्ह । भगवान पुरुषोत्तमः । उपास्य इष्ट देवोनः । सर्वा विर्भाव कारणम् ॥१०॥थळचे गजानन योगेश्वर । जायेल्यांचे अकोली जहागीर । येथील बावन सर्वे नंबर। बारा एकर मधे आले ॥११॥ खामगावी देती आयकर । पाटील जम्मेदार इजारदार । श्रीमंत महाराज भास्कर । आले घोड्यावर ते वेळी ॥१२॥ त्यांना पाणी मागती गजानन । ते नायकती भास्कर जाण । ने दी तरी हे हो नका देऊ अन्न । फुकाचे जीवन तरी पाजी ॥१३॥ श्री गजाननांनी ते वेळा । पाणी लावले तात्काळ । तव अकस्मात कूप गडगडिला । प्रलयांती खवळला सिंधू जैसा ॥१४॥ घोड्याहूनि उडोनि सत्वरी । भास्कर लोळती श्री पायावरी । श्री संताचिया माथा चरणावरी । साष्टांग हे करी दंडवत ॥१५॥ श्री कृपे ब्रह्मपुत्र । भास्कर महाराज केले पवित्र । माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरूवार । केला अंगिकार तुका म्हणे । येथे चातुर्मास्य तप केले । श्रींनी योगी सम्राट बनविले । गुरु शिष्यानी विश्व उद्धरिले । चाळीस वर्षे भले भक्त कार्या ॥१७॥ दास नवमी उत्सवात । कुत्रा चावला बाळापुर आत चौर्यांशी दिवस पर्यंत गुरु बाळापूरात । चौर्यांशी दिवस पर्यंत । गुरु वाचवित भास्करांना ॥१८॥ नाशिकादि त्रंबकेश्वर । देहू आळंदी पंढरपूर । अधिक चैत्र मासभर । श्री फिरूनि सत्वर शेगावी आले ॥१९॥ निज चैत्र कृष्ण पंचमीपर्यंत । श्री सप्ताही भास्कर नगरात । काला करोनि समाधिस्थ । संजीवन होत भास्कर बाबा ॥२०॥ शके अठराशे एकोणतीस । चैत्र कृष्ण पंचमी गुरुवारास । संजीवन समाधी भास्कर बाबास । स्वहस्ते खास गुरूंनी दिली ॥२१॥ पंधरा दिन सप्ताही भले । लाखो भक्तांना भोजन दिले । कावळ्यांचे येणे बंद केले । श्री मंदिरी भले भास्करांच्या ॥२२॥ चार सप्ते यात्रा करून । शके अठराशे बत्तीसी जाण । ऋषी पंचमीसी गजानन । पर ब्रम्ही लीन शेगावीं॥२३॥ श्री भास्कर कृत मंदिरात । शेगावी होऊनि श्री समाधिस्थ । भास्कर मंदिरी श्री प्रगटत । नित्य स्मरत “राम कृष्ण हरि” ॥२४॥ मग वार्षिक नेमे संपूर्ण । राज्यपत्रे कोर्टाच्या नकला दाखवून । श्रीचे शेताचे पर्चे दाखऊन । चरित्र खंडन खोट्यांचे केले ॥२५॥ सर्व चरित्रकार चुकले । शेगाव अडगाव मध्ये अकोली वर्णिले । ही जायले अकोली जहागीर भले । पूर्वेस वहिले श्रींचे गाव ॥२६॥ श्रीचे पाठी भाकर डोई घागर । भास्कर महाराज वाहती वखर । हे खोटे वृत्त देती चरित्रकार । भास्कर आयकर दाते साहू ॥२७॥ पटवर्धन नव्हते आकोल्यात । बायजा हळदे माळी नव्हत । भोकरे बायजी तारूण्य वृत्त । लिहिले अनृत चरित्रकारे ॥२८॥ राघो भोपाजी तायडे शेतात । आम्रवृक्ष हिरवा होत । शके अठराशे चोवीस चे वृत्त । कोंडोंली घडत श्री कृपे ॥२९॥ शेगावी चंदू पाटील मुकुंदाचा । श्री कानवला खाती त्यांचा । श्री मंदिर नंबर दिंडोकाराचा । प्रतिबुकी साचा दाविला ॥३०॥ गजानन निर्व्यसनी खास । योगी सम्राट पुराण पुरुष । तेथे दुष्ट गुण न मिळे निःशेष । चैतन्याचा वास झाला अंगी ॥३१॥ देहू आळंदी पंढरी वारी । दिंडोकार ऐकविती ज्ञानेश्वरी । एकादशी कंठी माळा साजिरी । गजानन निर्धारी ब्रह्मवेत्ते ॥३२॥ तो हा एकोणसत्तरावा । श्री कृत उत्सव बरवा । अखंड गुरुकृपे सर्वा । श्री भक्त रावा प्राणप्रिय॥३३॥ श्रीकृष्ण चरित्र भावे । सकल संत गाथ्यात बरवे । चरित्र ते उच्चारावे । केले देवे गोकुळी ॥३४॥ अध्यात्म रूपके चरित्र थोर । बालक्रीडा संती वर्णिली अपार । दुर्जनांचा येणे करूनि संहार । पूर्णावतार रामकृष्ण ॥३५॥ नामदेवांचे अभंग सर्वथा । वर्णावे कृष्ण चरित्रार्था । करील जो प्रश्न सांगेल जो कथा । श्रवण करिता उद्धरील ॥३६॥ समाजकंटक वहिले । परपीडक दैत्य हे भले । पापी जे अभक्त दैत्य ते मातले । धरणीसी झाले ओझे त्यांचे ॥३७॥ पृथ्वी गोरुपे साचार । सांगिती पृथ्वीवरील हाहाःकार । बुडविला धर्म अधर्म झाला फार । सोसवेना भार मज आता ॥३८॥ ब्रम्हेंन्‍द्र शिव वंधिती माधव । पुरुष सुक्ते प्रार्थिती सर्व । ब्रह्मा आणि इंद्र बरोबरी शिव । चालियले सर्व क्षिराब्धीसी ॥३९॥ ब्रह्मदेवा साक्षात समाधीसी । साक्षात्कार सांगे देवासी । आकाशवाणी होय सांगे सकळासी । तळमळ मानसी करू नका ॥४०॥ आत्मसद्भाव वसुदेव पूर्ण । श्रद्धा भक्ति देवकी सलग्न । देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राह्मण गायी भक्त ॥४१॥ पृथ्वीवरील दैत्य मारले अपार । शेषा सांगे हरि सत्वर । शेषा प्रति बोले लक्ष्मीचा वर । चला अवतार घेऊ आता ॥४२॥ परशुरामे सहस्त्रार्जुना मारिले । त्यांचे अजिंक्य पाच राहिली मुले । जयध्वज शूरसेनादि भले । पांचालेश्वरी केले त्यांनी राज्य ॥४३॥ तस्य पुत्र सहस्त्रेषु । पंचैवोर्वरिता मृधे । जयध्वजो शुरसेनो । वृषभो मधुरूर्जितः ॥४४॥ वसुदेव शूरसेन नंदन । त्यांना देवकी दिली जाण । वसुदेवा देत देवकी बहीण । लग्नामध्ये विघ्न झाले ऐका ॥४५॥ आकाशवाणी सांगे कंसासी । देवकी पुत्र मारिल दैत्यासी । आठवा इचा पुत्र वधील तुजसी । ऐकता मानसी क्रोधावला ॥४६॥ वसुदेव बोधी कंसाप्रत । तुला देईन मी पुत्र समस्त । होताचि प्रसृत नेवोनिया देत । सहाही मारत दुराचारी ॥४७॥ गोकुळी नंदाचे घरात । बलराम झाले रोहिणीप्रत । सातवा तो गर्भ योग माया नेत । आश्चर्य करित मनामाजी ॥४८॥ बुधवार श्रावण कृष्ण अष्टमी । रोहिणी प्रगटले कैवल्यधामी । अयोनिसंभव नव्हे काही श्रमी । नामयाचा स्वामी प्रगटला ॥४९॥ ज्ञानाचा चैतन्य चिद्विलास होई । स्वयंभू प्रगटले शेषशाई । कोटीशा आदित्य गोठे एके ठाई । तेजे दिशा दाही उजळल्या ॥५०॥ ओळखिले तुज । कळलासी आजी मज । माता पिता वंदिती अक्षोक्षज । दिव्य ब्रह्मतेज बघोनिया ॥५१॥ नंदाच्या घराला । मज नेई गोकूळाला । भावे कृष्ण बाळ झाला । गोकुळी निघाला वसुदेव ॥५२॥ देहाहंता कंस कैदेत भला । ब्रह्मत्मेष वसुदेव मुक्त झाला । आपोआप बेड्या तुटल्या शृंखला । बंदाच्या अर्गडा कुलुपे कोंडे ॥५३॥ स्थूळ सुक्ष्म कारण महाकारण । हे मथुरा गोकुळ द्वारका वृंदावन । प्रेम व भक्ति यशोदा नंद पूर्ण । परब्रम्हा कृष्ण आत्माराम ॥५४॥ मंद मंद पडे पाऊस । शिरी छत्र धरी शेष । ज्ञानाचा चैतन्य विद्विलास । शेष कृष्णास छत्र धरी ॥५५॥ पूर चढला अचाट । त्यासी लाविला अंगुष्ट । चौदेही सत्रावी यमुना स्पष्ट । ब्रह्मरंध्रि अवीट वाट दिली ॥५६॥ रडे माया करी आकांत । नामा म्हणे उठवी दूत । यशोदाकन्या वसुदेव आणित । मथुरे रडत कंस येण्या ॥५७॥ तुज लागी वधी । उपजला माझे आधी । अष्टभुजा प्रकटोनि नभी । कृष्ण तुज वधी शीघ्र शोध ॥५८॥ सांगे ब्रह्मज्ञान । वसुदेव देवकीचे समाधान । वसुदेव देवकी सोडून । दैत्यसभे आपण कंस आला ॥५९॥ बारा दिवसातील पुत्र । मारण्याचे ठरवित । पूतना निघे त्या कामार्थ । रूप शोभिवंत धरोनिया ॥६०॥ कोटी मदनाचा हा बाप । प्रभा फाकली तेज हे अमूप । भूषणे विराजती दिव्य स्वरूप । नंदे पाहिले रूप स्वनयनी ॥६१॥ अभंग:-” गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा । बाळकृष्ण नंदाघरी । आनंदल्या नरनारी ॥ गुढया तोरणे । करिती कथा गाती गाणे ॥ तुका म्हणे छंदे । मन मोहिले गोविंदे” ॥६२॥ आनंदी आनंद मातला अपार । वेदानाहि पार न कळे ज्याचा थोर । कीर्तनाचा घोष टाळ्यांचा गजर । मृदंग सुस्वर वाजविती ॥६३॥ चिंता हरे लक्ष्मी गोकुळी पूर्ण । लोका कळले विश्वात्मा कृष्ण । गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान । केलिया वाचून जप तपे ॥६४॥ गोकुळीच्या गोपिका । संसारी होऊनी विमुखा । तन मन प्राणे मज लागी देखा । भावे निज सुखा पावल्या ॥६५॥ जो देवकी वसुदेवास्तव जाहला । कुमारीसाठी गोकूळा गेला । तो मी प्राणासकट पियाला । पुतनेसी ॥६६॥ सारा द्यावयासी । नंद गेले मथुरेसी । वासुदेवे कृष्ण गुह्य प्रेमेसी । सांगोनि नंदासी शीघ्र धाडिले ॥६७॥ असंभावना अभावनापादक । विपरीत भावना पुतना देख । दिक नाही देणे अरिमित्रा एक । पुतना कंटक मुक्त केली ॥६८॥ तुवा सनकादिकाचेनि माने । सायुज्यी सौरसु केला पुतने । जे विषाचेनि स्तनपाने । मारू आली ॥६९॥ दंभ शकटासुर उद्भटु । ज्ञानात्म कृष्ण मारित श्रेष्ठु । पाय हाणोनिया मोडीला शकटु । कृष्ण अलगटु देवकीचा ॥७०॥ आसुरी संपत्तीचे दैत्य द्वैत । षडरिपू ज्ञाने वधी कृष्णनाथ । कंसे पाठविला आला तृणावर्त । धुळीने समस्त व्यापियेले ॥७१॥ ब्रम्हात्मेष चैतन्य धामा । जगद्गुरु कृष्ण विश्वात्मा । सर्वहि आत्म वेद बोले सीमा । परि परब्रह्म राम कृष्ण ॥७२॥ त्रैलोक्य पावन जनीं जनार्दन । संत बोलती वचन । देवरूप कृष्ण योगिया संजीवन । त्या माजी परिपूर्ण आत्म ज्योती ॥७३॥ गोप गोपी कृष्णचि सगळे । चिद्विलासे खेळ आत्मलीले । निवृत्तीचे ब्रम्ह कृष्ण नामे खेळे । असंख्य गोवळे कृष्णरूप ॥७४॥ गोविंद आसनी गोविंद शयनी । गोविंद त्या मनी बैसलासे ध्यानी । ब्रह्म रंध्री आत्मा सुनीळ वर्णी । कृष्ण रूप पूर्णी पूर्णत्वेचि ॥७५॥ पंचमहाभूते व्यापूनि निराळा । सौंदर्य पुतळा काळाबाईची चित्कळा । ज्ञानदेवी निळा परब्रम्ही गोविला । कृष्ण मुर्ति सावळा हृदयी वसे ॥७६॥ अग्नी कर्पूराचे मेळी । काय उरली काजळी । भक्ती नवविधा तयासी घडली । अवघीच झाली कृष्णरूप ॥७७॥ देखिला गे माये सुंदर जगजेठी । नंद यशोदे दृष्टी ब्रह्मखेळे श्रेष्ठी । बाप रखुमा देवीवरु सावळा सर्वाघटी । चित्त चैतन्या मिठी घालित खेवो ॥७८॥ सर्व देही सर्व जीवी तो हरी । सर्वा ठायी सर्व भावे तो मुरारी । निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरी परमानंदु ॥७९॥ बाप रखुमा देवीवरु अभेदोनि भिन्न । हरिरूपी लीन जीव शिवी कृष्ण । चित्ती तो गोविंद लटिके दळण । करिती ते जन करिती तैसे ॥८०॥ आप रुपे गोकुळी आपरुपे आप । अवघेचि स्वरुप हरीचे जाणा बाप । सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप । ओतले स्वरूप माझी तया ॥८१॥ तटस्थ राहिले सकळ इंद्रिये व्यापार विसरली थोर । निवृत्ती साकार ब्रम्हीचा प्रकार । ॐ तत्सदाकार कृष्ण लीला ॥८२॥ परे परते घर । तेथे राहू निरंतर । वेधल्या त्या गोपी नाठवे आपपर । कृष्णमय शरीर वृत्ति झाली ॥८३॥ बळिया माझा पंढरीराव । जो या देवांचाहि देव ।जीवाचा हि जीव शिवाचा हि शिव । देही देहभाव कृष्ण माझा ॥८४॥ ऐशा निजात्मया जाणोनि गोविंदा । जीवे भावे त्या अनुसरल्या प्रमादा । करिती निशीदिनी सेवा वृत्ती सदा । हासती रुसती करिती विनोदावो ॥८५॥ नित्यानंदापुढे आनंद तो कोण । विषय सुखबाई बापुडे ते सीण । येथे न सरेचि वैकुंठ सदन । शेषशाही त्रिकूट भुवन वो ॥८६॥ नित्य जनी वनी हरि ते देखती । हरिची होऊनि हरिसी भजती । हरिरूप झाली त्यांची अंगकांति । हरीचि मुसावला ध्यानी-मनी चित्ती वो ॥८७॥ गायी गोपिकांचे नवल कोण । वृंदावनीचे तृणपाषाण । कृष्ण संगती तरले जाण । ऐसा ज्ञान घन श्रीकृष्ण ॥८८॥ त्या जाण समस्त श्रुति । गोपिका रूपे गोकूळा येती । रास क्रीडा मिसे एकांती । माझी सुख संगती पावल्या ॥८९॥ एका जनार्दनी ब्रह्म परिपूर्ण । तेणे वेधले आमुच्या मनाचे मन । जगाचे जीवन भक्तांचे मोहन । सगुण निर्गुण स्थान शोभतसे ॥९०॥ काया वाचा मने । तुका म्हणे दुजे नेणे । यशोदे कृष्णे चित्ते चोरिले । अवघे पारुषले हीन देही ॥९१॥ माझा देहचि कृष्ण झाला । जर चैतन्य भेद कृष्णे हरिला । बाप रखुमा देवीवरु दीनानाथ भेटला । विठ्ठली विठ्ठल झाला देह माझा ॥९२॥ गाऱ्याण्याचेनि मिसे । गौळणी चेवल्या ब्रह्मरसे । यशोदे गोपी कृष्ण दर्शन मिसे ।अशेषे खोड्या वर्णू ॥९३॥ प्रारब्ध हे शिळे दही । माझे खादले ग बाई । क्रियमान दूध साई । तीही कृष्णे वोतली ॥९४॥ मग गोविंद ते काया । भेद नाही देवा तया । अवस्था लावोनिया निवांतचि ठेल्या । एकाएकी झाल्या कृष्णरूप ॥९५॥ चैतन्य चोरूनि नेले । चित्त माझे सर्व गेले । पाहे तव तन्मय झाले । वो माय ॥८६॥ वेधले वो येणे श्रीरंग रंगे । मी हे माझी अंगे हारपली स्वांगे । सगुण निर्गुण जयाचेनि अंगे । तोचि आम्हा संगे क्रीडाकरी ॥९७॥ तप्त लोणी ज्ञानाग्नीचे । सिद्धांत नवनीत देऊ साचे । तुका म्हणे आगमीचे । मथिले साचे नवनीत ॥९८॥ संचित प्रारब्ध क्रियमाण । भक्ता नाही नाही जाण । तुका म्हणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ॥९९॥ पापी उद्धरण्या कोटी । गोपी पद रज सेवी जगजेठी । मारावया तिने उगारली काठी । भुवने त्या पोटी चौदा देखे॥१००॥ मागा बाळपणी येणे श्रीपति । जे एक वेळ खाद होती माती । मग कोपोनिया हाती । यशोदे धरिला ॥१०१॥ मग भेणे भेणे जैसे । मुखी झाडा द्यावयाचेनि मिसे । चौदाहि भुवने सावकाशे । दाखविली ॥१०२॥ ब्रम्हांडे देखिली । नामा म्हणे वेडी झाली । काम क्रोधा नाही चाली । भूती झाली समता ॥१०३॥ आजि देतो पोटभरी । पुरे म्हणाल तोवरी । गोपा दूध लोणी देती हरि । होण्या सत्वरी बलवंत ॥१०४॥ दावे अनंत लावित । दोन बोटे उणे येत । भक्ती उखडी प्रेम दोरीत । यशोदा बांधित कृष्णासी ॥१०५॥ देव भक्त भेदे ईश्वरा । द्वैत बांधू न शके जगदीश्वरा । नवलक्ष गोप न पुरती उदरा । माया दामोदरा बांधितसे ॥१०६॥ क्षराक्षर भव वृक्ष मोडती । कुबेर पुत्र शापमुक्त होती । वृक्ष मुळीहूनि दोघे निघतात । पाया पै लागती कान्होबाच्या ॥१०७॥ कुबेर पुत्र करुनिया नमस्कारु । स्व लोकी गेले सत्वरु । कैसेनि यांसी म्हणावे लेकरू । जगाचा हा गुरू मायबाप ॥१०८॥ शोषिली पुतना येणे मोडियले तरु । आळी न सांडी शारंगधरू । यशोदा म्हणे हा सर्वेश्वरु । कृष्ण योगेश्वरु जगद्गुरु ॥१०८॥ गाई गोपाळ यमुनेचे तटी । येते पाणीया मिळोनि जगजेठी । चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी । चला चला म्हणती पाहु दृष्टी वो ॥११०॥ चैतन्य चिद्विलासे जाणा । कृष्ण खेळती आप आपणा । सत्रावीचा खेळ लक्षणे ना कोणा । ब्रह्मादिका जाणा अगम्य तो ॥१११॥ बलराम कृष्ण गोपाळा । खेळता वत्सासुर मारू आला । वत्साचिये वेषे वत्सासूर आला । माराया कृष्णाला परिक्षीती ॥११२॥ बकासूर गिळी कृष्णाप्रत । ओकता कृष्ण त्यासी चिरत । दृष्ट बुद्धी ताव्हा देवासी गिळत । हृदय जाळित उगाळिला ॥११३॥कंसा धाडी अघासूर । मारी नंदाचा कुमर । अघासुर होऊनिया अजगर । गिळित सत्वर गोप वत्सा ॥११४॥ आत शिरला कृष्ण । रूप धरोनि वामन । अघासुरा शीघ्र मारुन । जिवंत संपूर्ण गोप केले ॥११५॥ भेणे गोपाळ पडिले । कृपादृष्टी उठविले । तेज अद्भुत प्रगटले । कृष्ण मुखी प्रवेशले पूर्ण ॥११६॥ लवण मेळविता जळे । काय उरले निराळे । विचित्र विंदाणी नाना कळा खेळे । नाचवी पुतळे नारायण ॥११७॥ खांदी भार पोटी भूक । काय खेळायचे सुख । पाहता श्रीमुख सुखावले सुख । डोळियाची भूक न वचे माझ्या ॥११८॥ नाम गाऊ नाम ध्याऊ । नाम विठोबाला वाहू । आता हेचि जेऊ । सवे घेऊ शिदोरी ॥११९॥ तुका म्हणे काला । कोठे अबेद देखिला । हरीनामाचा खिचडी काला । प्रेमे मोहीला साधने ॥१२०॥ तुका म्हणे घास । मुखी घाली ब्रह्मरस । चवी चवी घेऊ ग्रास । ब्रम्हरस आवडी ॥१२१॥ सगुण निर्गुण जयाचिये अंगे । तोचि आम्हा संगे क्रीडा करी वेगे । तुका म्हणे गोड लागे । तो तो मागे रसना ॥१२२॥ विठोबा रखुमाई भजन । घेऊनिया चाल म्हणून । विठ्ठल विठ्ठल गर्जोन । काल्याचे किर्तन सुरू केले ॥१२३॥ कदंबी वत्सा बैसवून । गोप कृष्ण करिती भोजन । रामकृष्ण नारायण । ब्रम्हरसी वरी नामाचे चिंतन । सेवारे सज्जन सखे माझे ॥१२४॥ करुभजन भोजन । रामकृष्ण नारायण ।
भक्ति हेचि भाण परब्रम्ह पक्वान्न । गुरु मुखे जेवण जेवीतसे ॥१२५॥ कालिंदीचे हृदय शल्य फेडिले । जेणे मिया जळत गोकुळ राखिले । वासरूवासाठी लाविले । विरंचिस पिसे ॥१२६॥ कवतुक पहावया माव ब्रम्हाने केली । वत्से हि चोरोनिया सत्य लोकांसी नेली । गोपाळ गाई वत्स दोही ठाई राखिली । सुखाचा प्रेमसिंधू अनाथांची माऊली ॥१२७॥ आणखी एक येणे नवला केला । काला वाटिता विधाता ठकविला । भाग नेदिता तो वत्स गोप घेऊनि गेला । आपण तैसाचि तेथ । होवोनिया ठेला वो ॥१२८॥ गोपाळ वत्से कृष्ण बनून । गोकुळी खेळत आले पूर्ण । गायी वत्स गोपाळ स्वये झाला कृष्ण । न लागता परीक्षीती ॥१२९॥ गोकुळासी आले । ब्रम्ह अव्यक्त चांगले । कृष्णाचि गोपाळ बनले । गोपींनी पाजिले प्रेमे स्तन ॥१३०॥ तन्मातरो वेणु रव त्वरोत्थिता । उत्थाप्य दोर्भिः परि रभ्य निर्भरम् । स्नेहः स्नुत स्तन्य पयः सुधासवं । मत्वा परब्रम्ह सुतान पाययन ॥१३१॥ अमृत द्राक्षापेक्षा गोड पूर्ण । गोपीचे स्तनीचे दुध पिती कृष्ण । शरणांगता देत क्षिर सिंधू जाण । चोखीतसे स्तन आवडीने ॥१३२॥ वर्षभर गोपींनी कृष्णाला । स्तनीचे दुध पाजिले त्या काळा । एक संवत्सर सकळ हि झाला । पहावया आला ब्रह्मदेव ॥१३३॥ गोप वत्स सत्य लोकात । ते केव्हा आली कैसी येथ । घेवोनिया गेलो तेचि आले येथ । जाऊनिया तेथे पहातसे ॥१३५॥ ब्रम्हा म्हणे मज वाचून । दुजा ब्रह्मदेव नाहीच जाण । ब्रह्मांडात ब्रह्मा दुजा असे कोण । केलेसे निर्माण याचलागी ॥१३६॥ अनंत कृष्णमूर्ती पूजिती । शिव ब्रम्हेंद्र तत्वे श्रुति । कोटीशारे ब्रम्ह कोटी मूर्ती दिसती । स्तवन करिती सुरवर ॥१३६॥ जडचैतन्य भेद रहित । स्वरूप स्वतःसिद्ध एकरस समस्त । ब्रम्हा सर्व ब्रम्ह बघत । ब्रम्हांडी अमूर्त चित्कृष्ण ॥१३७॥ कृष्णतेजे निस्तेज होत । उभा मौन्ये जोडोनि हात । कृष्णमायापट दूर करित । ब्रम्हा पूर्ववत कृष्णा बघे ॥१३८॥ हंसी उडोनि कृष्णा वंदित । चारी मुकूट शिरे पायी ठेवीत । आनंदाश्रूंनी अभीसिंचित । कापे जोडी हात क्षमा मागे ॥१३९॥ ओळखी बापाला । ब्रह्म तेव्हा धाविन्नला । चैतन्य चिद्विलास लीला । देखोनि भला शरण आला ॥१४०॥ घाली पोटामध्ये डोई । क्षमा करी माझे आई । चतुःश्लोकी भागवत तई । स्मरोनि होई लज्जित ॥१४१॥ तुम्ही उत्पादिता ब्रह्मा विष्णू पालना । रुद्रत्वे करीसी संहाराणा । दृष्ट नाशा धर्म रक्षणा । पूर्णावतार कृष्णा चिद्विलासे ॥१४२॥ स्वयं ज्योति आद्दा अक्षरा अनंता । निरंजना पूर्णा नित्य मुक्ता । अजन्मा सौख्या अद्वया अमृता । उपाधि रहिता जगद्गुरु ॥१४३॥ कृष्णा गोप वत्से बनून एक वर्ष प्याले गोपींचे स्तन । कोणे योनी या वनी जन्म द्या पूर्ण । रजे उध्दरीन गोपी पदांच्या ॥१४४॥ इतुके मागीतसे तुज । वनी जन्म देई मज । वेद भक्त धुंडीती पद रज । ते प्राप्त सहज तव कृपे ॥१४५॥ काय देशील याजला । ब्रम्हा म्हणे न कळे मला । विष पिऊन मोक्ष पुतने दिला । तू गोपी पुण्य झाला नित्य ऋणी ॥१४६॥ यातुधान्यपि पिसा स्वर्ग । मवाप जननी गतीम् । कृष्ण भुक्त स्तनः क्षीरा । किमुगावोऽनुमातरः ॥१४७॥ पयांसी यासां पिवत । पुत्र स्नेह स्नु तान्यलम् । भगवान देवकी पुत्रः । कैवल्याद्यखिलप्रदः ॥१४८॥” अहोऽतीधन्या व्रजगोरमण्यः । स्तन्यामृतं पित मतिव ते मुदा । यासांविभो वत्स तरात्मजात्मना । यतृप्तयेऽद्दापि न चाल मध्वरा” ॥१४९॥ भागवती तेरा चौदा अध्यायी । हे सव्वाशे श्लोक अक्षई । धन्य त्या गोपी धन्य त्यांच्या गाई । धन्य तेचि महि ब्रम्हा म्हणे ॥१५०॥यथाव्रजगोपिकानाम’ । नारदोक्ति शुक गुरु गोपी निष्काम । गोपी श्रुती पूर्ण ब्रम्ह । ज्ञानाचा अध्यात्म चिद्विलास ॥१५१॥ संपूर्ण गोपीचे स्तनपान । भक्ती प्रेमे प्याले एक वर्ष कृष्ण । ‘मातृवत परदारेषु’ वचन । जगद्गुरु कृष्ण पूर्ण ब्रम्हा ॥१५२॥ घरच्या स्त्रिया सहस्त्र सोळा । गोकुळादि मथुरेच्या अबला । तुजविषयी कराया गोपाळा । नव्हती सकळा समर्था ॥१५३॥ त्याचेनि तुज न करवें विषयी । परि त्वा त्याच केल्या निर्विषयी । ऐसा त्र्यैलोक्याचे ठायी । स्वामी एक पाही तू श्रीकृष्णा ॥१५४॥ विषारी पिता पुतनेचे स्तन । तिसी मोक्ष दिला पूर्ण । वर्षभरी प्याले गोपींचे स्तन । काय आपण द्याल त्यांना ॥१५५॥ त्यांचा कर्जदार तुम्ही झाला । जन्मोजन्मी भक्ती प्रेम भी । ऋण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥१५६॥ आकारासी कैसा ठाव । देह प्रत्यक्ष झाला देव । आठव नाठव गेले भावाभाव । झाला स्वयमेव पांडुरंग ॥१५७॥ पंचयोजन वृंदावनात । चिदं देह रूप चिद्विलासात । विश्वात्मा श्रीहरि क्रिडे या वनात । तृणादि समस्त धन्य धन्य ॥१५८॥ कृष्ण चैतन्य चिद्विलास थोर । गोप-गोपी कृष्णचि नारी नर । नामा म्हणे होय सकाळांचा उद्धार । म्हणुनी श्रीधर वना जाये ॥१५९॥तुका म्हणे सांगू काय । एकाएकी वृत्ति हरिमय । भवसिंधू तराया एकचि उपाय । घ्यावे तुझे पाय केशीराजा॥१६०॥ देखती जे डोळे । रूप आपुलेचि खेळे । अहर्निशी कीर्ती गाती भाविक भोळे । त्यांनी तुज जिंकीले ब्रम्हा म्हणे ॥१६१॥ आणुनिया देत । गोप वत्से समस्त । ब्रह्मदेवे गोप वत्से त्वरित । कृष्णा अर्पिता सांगे साष्टांगे ॥१६२॥ आज्ञा घेवोनिया गेला । नामा म्हणे स्वस्थळाला । हरी नामाचा खिचडी काला । प्रेमे मोहीला साधने ॥१६३॥ चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू । नंदाचा नंदन येणे केला नवलाऊ । आता हेचि जेऊ । सवे घेऊ शिदोरी ॥१६४॥ पांचवी गौळण हिरवा रंग । अवघ्या झाल्या दंग । फुगडी खेळती कृष्णासंग । एकनाथ अभंग ऐस्या आल्या पांच गौळणी ॥१६५॥ नामस्मरणाची क्षुधापोटी आगळी । तेणे तृप्ति होय सहजी सकळी । सुषुम्नेचे रुची तुर्या आतुडली । अहर्निशी आली खेळावया ॥१६६॥ कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू । उतरी पैलपारू भवनदीचा थोरू । मग हे वोगरू आदि हरि हरू । करी पाहुणेरू निज रूपा ॥१६७॥ हरिनामाचा कवल घेता । तेणे धालो पै सर्वथा । तुका म्हणे आता । आम्ही मुक्तीचिया माथा पूर्ण ॥१६८॥ जेऊनिया तोचि घाला । हरिचिंतने केला काला । तुका म्हणे काला । कोठे अभेद देखिला ॥१६९॥ झाले तटस्थ त्रिलोकीचे जीव । विसरला शिव देह । तुका म्हणे कैचि कीव । कोठे जीव निराळा ॥१७०॥ऐसा करिता सदा गदारोळ । येर येरा मुखी घालिती कवळ । ब्रम्हानंदाचा सुकाळ । हास्य विनोदे जेवती ॥१७१॥ काया-वाचा-मने । तुका म्हणे दुजे नेणे । तुका म्हणे सुख देह निरसने । चिंतने चिंतने तद्रूपता ॥१७२॥ जन्म नाही रे आणिक । तुका म्हणे माझी भाक । अवघी निवारिली निवारीली भुक । अवघ्या दुःख जन्माचे ॥१७३॥ तवत्या वल्लभा गौळणी नारी । नाना परीच्या आरती करी । घेऊनि आत्मया श्रीहरि । ओवाळिती निज भावे ॥१७४॥ अभंग- “कंठी धरिला कृष्णमणी । अवघा जनी प्रकाश ॥ काला वाटू एकमेका । वैष्णव निका संभ्रम ॥ वाकुलिया ब्रह्मादिका । उत्तम लोका दाखवू ॥ तुका म्हणे भूमंडळी । आम्ही बळी वीर गाढे” ॥ संत मंडळी भजनी रंगली । जयघोषे टाळी पिटली । जय जय ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ॥१७५॥ काला करिती संतजन । सवे त्यांच्या नारायण । निवृत्ती संपूर्ण काला देती जाण । ब्रह्म सनातन गोकुळीचे ॥१७६॥ एकचि घाई झाली वाळवंटी । माझा ज्ञानदेव गोपाळासी लाह्या वाटी । निवृत्ती सोपान कालविले काली मिठी । वैष्णवासाठी प्रेम काला ॥१७७॥ प्रसाद वाटूनि केली आरती । नवे वर्ष पहारा प्रारंभिती । भक्त “रामकृष्णहरी” म्हणती । शिदोर्‍या वाटती एकमेका ॥१७८॥ शिदोंऱ्यांचा करू काला । एक वाटती एकाला । शिदोर्‍या होत्या पासी सकळा । भोजनी बैसे मेळा भक्तांचा ॥१७९॥ आगी वारा विषादि विघ्न । श्रींनीच निवारून केले हे कीर्तन । ते टेपरेकॉर्ड बघा वाजवून । साक्षात पूर्ण दिव्याती दिव्य ॥१८०॥ अद्भुत चरित्र गजाननांचे । किंचित् लिखाण केले त्यांचे । अवतरणिका ऐका साचे । स्थैर्य चित्ताचे करोनिया ॥१८१॥ प्रथमोध्यायी मंगलाचरण । बालयोगेश श्री जन्म कथन । गणेशराव श्री गजानन । थळ ग्रामी पूर्ण अवतार ॥१८२॥ दुसर्‍याध्यायी कथा सुंदर । श्री उतरून गेले महापूर । बैलाविन शेती नागर । सोनुबाई पुत्र श्री देत ॥१८३॥ तिसऱ्यात कथा गहन । बालयोगेश श्री गजानन । कर्ताजीस पुत्र देऊन । दिले वरदान भक्तजना ॥१८४॥ कथा चौथ्या अध्यायात । पाणी निर्मिले कोरड्या विहिरीत । भास्करा केले ब्रह्मपुत्र । योगीसम्राट श्री गजानन ॥१८५॥ पांचवे अध्यायी जाण । केले कावळे निवारण । मीननाथ नरसींगा सवे जाऊन । ब्रम्हात्मेष ज्ञान प्रबोधिले ॥१८६॥ षष्टाध्यायी कथन । भावज्या जिवंत केला जाण । पितांबराचा तुंबा भरून । केले भोजन बंकटलाल गृही ॥१८७॥ सातवे अध्यायी भले । ऋणमोचना गुरु गेले । झिंगाजींना सिध्द केले । नरसिंगा बोधिले धारगडी ॥१८८॥ आठव्यात कथा सुरस । चमत्कार हरि पाटलास । नरसिंग बुवा समाधीस । हरिबाबास मंत्र दिला ॥१८९॥ नवव्यात कथा लीला । ब्रह्मज्ञान पुंडलिक बोवाला । वेद शास्त्रार्थ कथिला । पुत्र दिला चिमणाजीस ॥१९०॥ दहावे अध्यायात । ब्रह्मगिरीचा गर्व हरत । भोजन नागपुरात । गौरीशंकर संत गृही तैसे ॥१९१॥ अकराव्यात कथासागर । गंगारामा विजय थोर । शंकरसिंहा दिला वर । दिले सप्तपुत्र खेतान शेठा ॥१९२॥ बारावे अध्यायी कथा भली । देहू आळंदी पंढरीस्थळी । वारी करोनि भक्त मेळी । दिले वेळोवेळी सर्वा ज्ञान ॥१९३॥तेरावे अध्यायात । खापर्डे पूजा अमरावतीत । पितांबरार्थ आंबा हिरवा होत । वरदान देत विष्णुसाला ॥१९४॥ चौदाव्यात कथामृत । कुत्रा केला जिवंत । कोल्हाटकरा दिला पुत्र । कीर्तनी प्रख्यात माधव बुवा ॥१९५॥पंधराव्यात कथा गोड । श्री स्थिर कोंडोली पडता झाड । क्रूर गाय शांत घोडे द्वाड । भोकरेंचे कोड पुरविले ॥१९६॥ सोडाव्यात कथा सुरस । वर दिला भास्कर महाराजांस । श्रींनी स्वहस्ते समाधीस । संजीवन खास बैसविले । सतराव्या कथा पूर्ण । भक्तांना देऊनि वरदान । पंढरीसी विठ्ठलांना वंदून। झाले गजानन ब्रह्मी लीन ॥१९८॥ अठरावे अध्यायी कथा जाण । अडगांवी भेटले श्री गजानन । पुंडलिक बुवा रक्षून । वैकुंठी आपण पाठविले ॥१९९॥ एकोणविसाव्यात । गजानन चमत्कार अनंत । श्रीच गौरीशंकर महाराज होत । आज्ञा देत जीर्णोद्धारा ॥२००॥ विसावे अध्यायी भले । श्री भास्कर महाराज मंडपा केले । वासुदेव बुवा वाचविले । नित्य चालविले हरिस्मरण ॥२०१॥ एकविसाव्यात । श्रींचे चमत्कार बहुत । काल्याचे किर्तन श्रीचि करित । सर्व हरित महाविघ्ने ॥२०२॥ सर्प श्वान व्याघ्र विष हरले । भक्तांना साक्षात्कार झाले । गजाननांनी वरदान दिले । सौख्यानंद मिळे सर्वांसी ॥२०३॥ चतुरा होय ज्ञान प्राप्ति । सुव्यवहार्ये सुखी होती । ज्ञानोत्तर मिळोनि प्रेमभक्ति । जगी यश कीर्ती पावतील ॥२०४॥ तुका म्हणे नारायण । येता गोळ्या वारील बाण । तुका म्हणे यश कीर्ती आणि मान । करिता जतन देव जोडे ॥२०५॥ मग तो होऊ नेदी शीण । आड घाली सुदर्शन । सत्य संकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥२०६॥ एका जनार्दनी संत । पूर्ण करिती मनोरथ । इच्छादानी येथे वोळला समर्थ । सर्वांचे मनोरथ पूर्ण करील ॥२०७॥ पुत्र पौत्र धान्य धन । यम नियमे आरोग्य पूर्ण । इह पर भोग मोक्ष जाण । भक्ता आत्मज्ञान प्राप्त होय ॥२०८॥सोळा सप्त एकवीस पारायण । करिता होय गजानन दर्शन । देव संत होऊनी प्रसन्न । इच्छिले ते पूर्ण करतील ॥२०९॥ एक अध्याय करिता श्रवण । कोटी अश्वमेध घडती पूर्ण । करोडो गो दाने गंगास्नान । मिळेल संपूर्ण पुण्य तुम्हा ॥२१०॥ गजानन चरित्र कल्पतरू । कामधेनु चिंतामणी हे थोरू । रिद्धी सिद्धी सर्व संत देव गुरु । होतील सर्वेश्वरु प्रसन्न ॥२११॥ गुरु पुष्यामृत योगावर । पारायण करिती जे भक्तवर । त्यां श्री गजानन भास्कर । देतील सत्वर सर्व फळ ॥२१२॥ हृदयी प्रगटोन गजानन । त्यांनीच घेतले सर्व लिहोन । इतिहास संत लेखावरून । राज्यपत्रा जाण आधारे ॥२१३॥ वाहतो गजाननाची आण । ग्रंथकर्ता मी नव्हेचि जाण । श्रींनीच घेतले लिहोन । त्रिसत्य आण विठ्ठलाची ॥२१४॥ शिवे उमे उपदेशिले । ते गुह्य मच्छिंद्रा लाभले । मच्छिंद्रे गोरक्षा बोधिले । गोरक्षे दिले गहिनीनाथा ॥२१५॥ गहिनीनाथे ते ज्ञान । निवृत्तीनाथा दिले जाण । त्यांचे शिष्य ज्ञानेश भगवान । सद्गुरु पूर्ण तेचि आम्हां ॥२१६॥ सद्गुरु श्री ज्ञानेशांचा दास । सर्व संताचे चरण रज खास । लोटांगण भावे तुम्हास । मज किंकरास क्षमा करा ॥२१७॥ कुलगुरू आत्म गणेशासी । पितामह ज्ञान भास्करासी । भक्त पुंडलिक बाबासी । चंद्रभागा मातेसी वंदू भावे ॥२१८॥ जोग महाराजा नमन । दांडेकरा लोटांगण । मारुती बुवा लक्ष्मण बुवा वंदन । शांतारामादि जाण तैसेचि ॥२१९॥ विश्वात्मक श्रीगुरुदेवे । या चरित्र यज्ञ संतोषावे । कृपेने ग्रंथा वरदान द्यावे । सुखी करावे सर्व जगा ॥२२०॥ भक्त हृदय मंदिरात । आत्मरूप गजानन प्रगटोत । मुक्तिवरील भक्ति देवोत । सुमनात सदैव कृष्ण ॥२२१॥दुष्टांचा दुष्टपणाच जावा । त्यांना सत्कर्मी प्रेमा द्यावा । भूती बंधुभाव असावा । समुदाय भेटावा संतांचा ॥२२२॥ अज्ञान पाप अंधार जावो । जगी स्वधर्म चित्सूर्य उगवो । जो जे इच्छिल ते फळ होवो । श्रद्धा भक्ती भावो द्या सर्वा ॥२२३॥ सर्व सुखे निजानंद । पूर्ण मिळो ब्रह्मानंद । हरिचिंतनी लागो छंद । भक्ति प्रेमे गोविंद सर्व भजो ॥२२४॥
🌹राम कृष्ण हरि🌹
: https://www.facebook.com/groups/150222028895840/
{🌹आम्ही वारकरी🌹}

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: